पाली-जाभुळपाडा-अक्कलकोट...
दर वर्षी दिवाळीत मी सहपरिवार सहल करतो. छान ठिकाणं, तिथलं खाद्य आणि संस्कृती अनुभवतो. एक जानेवारी २०२६ला मी एक संकल्प केला. तो संकल्प होता देव दर्शनाचा. वर्षातून एकदा का होई ना, पण एखाद्या देवळाला किंवा पवित्र जागेला भेट द्यायचीच हा विचार. सकाळी माझी ही कल्पना मी कुटुंबासमोर मांडली, आणि ती लगेच मान्यही झाली...
पाली-जाभुळपाडा-अक्कलकोट (पहिला भाग)...
माझ्या देव दर्शनाच्या संकलल्पासाठी अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि तुळजापूरची तुळजाभवानी या दोन देवस्थानांचे विचार मनात होते. पण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही श्री गणेश वंदनेने केली जाते. म्हणून माझ्या संकल्पाची सुरुवातही, पालीचा बल्लाळेश्वर आणि जांभुळपाड्याचा सिद्ध-लक्ष्मी गणेश, या दोघांच्या दर्शनाने करायची असं ठरलं. २४ ते २६ जानेवारी ही तीन दिवसांची मोठी सुट्टी असल्याने हेच दिवस आम्ही निवडले...
पाली...
पालीला किंवा जांभुळपाड्याला आपल्या गाडीने जाता येतंच, पण पनवेल किंवा खोपोलीमार्गे बसची सुविधाही आहे. आम्ही तोच मार्ग निवडला. २४ जानेवारी २०२६ रोजी एकदम सकाळी, मुंबईच्या गोरेगाव रेल्वे स्थानकावरून आम्ही सुरुवात केली. पनवेलच्या ट्रेनने आम्ही पनवेल स्थानक गाठलं. तिथून शेयर टमटम म्हणजे मोठी रिक्षा (काही जाणं त्या वाहनाला डुक्करदेखील म्हणतात...) करून आम्ही पाचंच मिनिटात पनवेल बस स्टॅंडला आलो. पालीला जाणारी बस तिथे लागलीच होती. जर जुना मुंबई-पुणे रस्ता धरला, तर खोपोली फाट्यावरून उजवीकडे सुमारे ४० किलोमीटरवर पाली आहे. जर जलदगती महामार्ग धरला, तर खालापूर टोलनाका ओलांडल्यावर पाली फाटा लागतो. तिथे बस सोडून दिली, की पुन्हा खोपोलीमार्गे येणाऱ्या टमटम किंवा बसने साधारण चाळीसेक मिनिटात आपण पालीत दाखल होतो. जलदगती महामार्गाने जात आम्ही साडे अकरा वाजता पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानाच्या कमानीजवळ पोहोचलो...
पालीचा बल्लाळेश्वर म्हणजे अष्टविनायकांपैकी एक. हा एकमेव असा गणपती आहे, जो त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखला जातो. बल्लाळ नावाचा एक मुलगा श्री गणेशाचा निस्सीम भक्त होता. एकदा एका मोठ्या दगडाला श्री गणेश स्मरून त्याची मनोभावे पूजा करताना बल्लाळचे देहभान हरपले. हे पाहून बल्लाळचे वडील कल्याण रागावले. त्यांनी तो दगड फेकून दिला आणि बल्लाळला तिथेच एका झाडाला बांधून ठेवलं. श्री गणेशाचा जप करताना बल्लाळ बेशुद्ध झाला आणि त्याच्या करूण हाकेने श्री गणेश प्रसन्न झाले. त्यांनी बल्लाळला वर दिला, की ते इथेच विराजमान होतील आणि त्यांच्या नावाआधी बल्लाळचं नाव घेतलं जाईल. श्री गणेश अंतर्धान पावले ते थेट कल्याणने फेकलेल्या दगडात. म्हणून बल्लाळचा ईश्वर, तो बल्लाळेश्वर...
आम्ही देवळात पोहोचलो तेव्हा तिथे अथर्वशीर्ष पठण सुरू होतं. मुख्य गाभाऱ्यात एक जोडपं पूजेसाठी बसलेलं होतं. गुरुजींचा मंत्रोच्चार सुरू होता. बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून आम्ही बाहेर आलो. अथर्वशिर्षाची दोन आवर्तनं ऐकून आम्ही देवळाच्या बाहेर पडलो. बस स्टँडला आलो तर खोपोलीकडे जाणारी एक बस तिथे लागली होती. त्याच बसने आता पुढचं ठिकाण होतं, जांभुळपाडा...
जांभुळपाडा...
खोपोली नाक्यावरून पालीच्या दिशेने वळल्यावर सुमारे १९ किलोमीटरवर जांभुळपाडा हे गाव आहे. खोपोलीहून पालीकडे जाणाऱ्या आणि पालीहून खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व बस जांभुळपाड्यात शिरतात. गावात बससाठी फक्त्त तीन थांबे आहेत. पहिला आहे अगदी वेशीजवळ, गावाच्या शाळेच्या गेटला लागून. दुसरा थांबा आहे मंदिराच्या बाहेर आणि तिसरा थांबा आहे तलाठी कार्यालयाच्या समोर. याच गावाच्या मधोमध आहे, दशभुजा असलेल्या, उजव्या सोंडेच्या सिद्ध-लक्ष्मी गणेशाचं मंदिरं. मांडीवर देवी लक्ष्मी, दहा हात आणि उजवी सोंड असलेल्या या गणेशाची मूर्ती अत्यंत दुर्मिळ आहे. १९७९ साली आलेल्या महापुरात पूर्ण गाव वाहून गेलं. पण मूर्ती आणि तिच्या बैठकीला जराही धक्का लागला नाही. त्यानंतर देवस्थानचे त्या वेळचे अध्यक्ष नाना बोडस यांनी ते मंदिर आणि गाव पुन्हा उभारलं...
आम्ही जांभुळपाड्याची वेस ओलांडली तेव्हा दुपारचा एक वाजला होता. भूक मी म्हणत होती. 'आधी पोटोबा मग विठोबा...' ही म्हण आठवत आम्ही जेवणाची व्यवस्था पाहू लागलो. गावात तीन-चार ठिकाणी जेवणाची व राहण्याची उत्तम सोय आहे. पण मुख्य ठिकाणं दोनच. एक आहे वेशीजवळ आणि गावाच्या सुरुवातीलाच असलेलं रेस्ट इन फॉरेस्ट आणि दुसरी आहे मंदिराजवळ असलेली सदू दीक्षित यांची खानावळ. आम्ही खानावळीचा पर्याय निवडला कारण मंदिर आणि परतण्यासाठी बस, दोन्ही तिथेच मिळणार होतं. दीक्षितांच्या खानावळीतल्या रुचकर घरगुती जेवणावर यथेच्छ ताव मारल्यावर आम्ही मंदिरात गेलो. अत्यंत शांत आणि पवित्र वातावरण होतं तिथे. गाभाऱ्यासमोरचा परिसर, ग्रामस्थानीं लिहिलेल्या कविता, तैलचित्र यांनी सजला होता. एकदम प्रसन्न वाटत होतं तिथे...
परिसराच्या एका कोपऱ्यात बसचं वेळापत्रक लावलं होतं. पनवेलला जाणारी बस येताच आम्ही देवळातून बाहेर आलो आणि परतीच्या मार्गाला लागलो. आता पुढचं ठिकाण होतं, अक्कलकोट...
अक्कलकोट-सोलापूर...
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन, हा चांगला विचार होता. पण तिथे पोहोचायचं कसं, हा मुद्दासुद्धा होता. तीन पर्याय समोर आले. एक म्हणजे संपूर्ण गाडी करून जाणं. पण तो पर्याय जरा खर्चिक होता. त्यामुळे ट्रेन आणि बस हे दोन पर्याय उरले. ट्रेनने जाणं जास्त सोईस्कर ठरणार होतं. ट्रेनचं बुकिंग दोन महिने आधीच सुरू होतं. त्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातच मी ट्रेन बुकिंगच्या मागे लागलो. हे एजंट लोक काय करतात देव जाणे. बुकिंग सुरू होण्याच्या फक्त पाच मिनिटात वेटिंग अकरावर पोहोचलं. मी ट्रेनचं बुकिंग केलं. आमचे वेटिंग क्रमांक १२ ते १४ होते. काहींचं म्हणणं पडलं तिकिटं कन्फर्म होतील, तर काहींनी सांगितलं जाता येणार नाही. तेव्हा मग शेवटचा मार्ग म्हणून बसचंही बुकिंग करायचं ठरवलं...
बससाठी बुकिंग पंधरा दिवस आधी करावं लागतं. आम्ही विचार केला जानेवारीपर्यंत थांबू. ट्रेनची तिकिटं कन्फर्म होण्याच्या मार्गावर असतील तर बघू. हे झालं अक्कलकोटला जाण्याचं. आता परत येण्याचाही विचार करायचा होता. परतीचा प्रवास ट्रेननेच करायचा हा ध्यासच होता माझा. अक्कलकोट आणि सोलापूरहून सुटणाऱ्या गाड्यांची यादी मी पाहू लागलो. पहिलीच गाडी होती, सोलापूर ते मुंबई वंदे भारत, आणि चेरी ऑन टॉप म्हणजे कन्फर्म सीट्स मिळणार होत्या. फिर क्या था... आम्ही लगेच एकमताने २६ जानेवारीच्या सकाळच्या वंदे भारतमध्ये तीन सीट्स बुक केल्या. जाण्या-येण्याचं नक्की झालं आता प्रश्न उरला तो २५ तारखेच्या रात्रीचा. कारण वंदे भारत सकाळी सहाची होती...
सोलापूर रेल्वे स्टेशन जवळ एखादं हॉटेल बघावं हा विचार होता. काही हॉटेल्स नजरेखालून घातल्यावर रेल्वे स्टेशनपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असलेलं प्रथम हॉटेल आम्ही हेरलं. तिथले राजेश दहिवले यांनी रूम आणि तिथल्या प्रवासासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आमची मोलाची मदत केली. एकेक पडाव पार होत होता. सगळं कसं जमून येत होतं. आता वाट पहायची होती २४ जानेवारी रात्री दहाची...
२४ जानेवारीला रात्री दहाची आमची बस होती. बस आमच्या स्पॉटला आलीच १०:१५ वाजता. तशी आरामदायक होती बस. प्रत्येक सीट म्हणजे एक गादी होती ज्यावर आरामात पसरता येत होतं. बुकिंगच्या वेळी तिथल्या कर्मचाऱ्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सकाळी आठच्या सुमारास बस सोलापूरला पोहोचायला हवी होती. पण ट्रॅफिक आणि ड्रायव्हर, दोघं फुरसतीत होते बहुतेक. तीन ड्रायव्हर्स होते, जे पाळी पाळीने बस चालवत होते. मध्येच १०-१५ मिनिटं थांबायचे. त्यांच्या त्यांच्यात बोलत बसायचे. सगळे प्रवासी जाम वैतागले होते. ड्रायव्हर्सना जाम शिव्या घालत होते. पण आपण बरे आपलं हळू-हळू ड्रायव्हिंग बरं या नात्याने ते ड्रायव्हर्स शांत चित्ताने चालवत होते. अखेर २५ तारखेला, साडे चार तास उशीरा, म्हणजे दुपारी १२:३० वाजता बस सोलापूरला पोहोचली. या विलंबामुळे आमच्या प्लॅनमध्ये आम्हाला बराच फेर-बदल करावा लागला. असा राग आला होता ना... पण ठिक आहे. हाही एक अनुभव गाठीशी...
आम्ही सोलापूरच्या संभाजी चौकात पोहोचलो. आमची गाडी तयारच होती. पंधरा मिनिटात आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो. प्रथम हॉटेल. सोलापूर मार्केटपासून जरा आत आणि रेल्वे स्टेशनजवळ असलेलं प्रथम हॉटेल खूप छान होतं. इथले सगळे कर्मचारी आमच्याशी खूपच छान वागत होते. आम्ही हॉटेलवर पोहोचलो तेव्हा एक वाजला होता. रूम ताब्यात घेऊन आम्ही आमची आन्हीकं उरकली. तोवर आमचं जेवणही आलं होतं. सकाळभराच्या प्रवासात नाष्ट्यासाठी कुठेही थांबता आलं नसल्याने आम्ही जाम भुकावलो होतो. आम्ही लगेच अन्नावर तुटून पडलो. इथल्या अन्नाची चव आणि प्रमाण दोन्हीही एकदम मुबलक आहे. दोन मोठ्या व्यक्तींना एक भाजी आणि एक भात व्यवस्थित पुरेल. मुख्य म्हणजे ज्या पोळ्या आम्हाला दिल्या गेल्या होत्या, त्या बऱ्यापैकी मोठ्या आणि समतोल भाजलेल्या होत्या. शरीराचं शुद्धीकरण झालं, पोटाची खळगी भरली. आता आस लागली होती स्वामींच्या दर्शनाची...
आमचा प्लॅन होता, आधी अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि मग तुळजापूरला भवानीमातेच्या दर्शनासाठी जायचं. संपूर्ण सकाळ प्रवासात गेल्याने आम्हाला तुळजापूरला जाणं रद्द करावं लागलं. सुमारे दोन वाजता आम्ही अक्कलकोटसाठी निघालो. सोलापूरहून अक्कलकोटला जायला महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस तर आहेतच, शिवाय रिक्षाही उपलब्ध आहेत. या रिक्षा मीटरवर नसतात. त्यांच्याशी घासाघीस करावी लागते. साधारण रु. १५००/- पर्यंत होतात. अशाच रिक्षा भक्तनिवासाच्या समोरही लागतात. रु. ५००/- ते रु. ७००/- मध्ये मंदिरासह अजून काही जागा, स्थळं ते दाखवतात आणि पुन्हा चौकात आणून सोडतात. आम्ही सोलापूर ते सोलापूर गाडीच बुक केली होती त्यामुळे हा प्रवास जरा सुखावह होता. जवळपास चाळीस कि. मी.चं हे अंतर आम्ही तासाभारत पार केलं. देवस्थानाच्या जवळच्या चौकात आम्ही पोहोचलो. चौकाच्या डाव्या बाजूला अन्नछत्र आहे आणि अन्नछत्रासमोर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तिथे बकाल गर्दी होती. आम्ही अन्नछत्रात प्रवेश केला. तिथलं प्रसादाचं जेवण चांगलं असतं. भाविक आणि श्रद्धाळू जी देणगी देतात, त्यातून हे अन्नछत्र चालतं. तिथून बाहेर पडून आम्ही मंदिराच्या वाटेवर चालू लागलो...
मंदिराच्या वाटेवर दोन्ही बाजूला विविध दुकानं आहेत. पूजेचं साहित्य, स्वामींचे फोटो, मुर्त्या, की-चेन्स, लॉकेट्स, शिवाय दुधाची मिठाई, असे सगळे प्रकार तिथे मिळतात. त्याच मार्गावर काही बायका किंवा मुली आपल्या कपाळावर भिजवलेलं गंध आणि भिजवलेलं कुंकू लावतात. त्या बदल्यात थोडे पैसे किंवा अन्न एवढीच त्यांची अपेक्षा असते. दुकानात वस्तू किंवा मिठाई खरेदी केल्यावर एक वेगळा प्रकार तिथे पहायला मिळाला. वस्तू विकत घेतली की दुकानदार वस्तूसह एक पावतीवजा चिठ्ठी आपल्याला लिहून देतो. ३-४ दुकानं मिळून एक, असे कॅश काऊंटर्स तिथे असतात. त्या काऊंटर्सवर जाऊन दुकानदाराने दिलेली चिठ्ठी द्यायची आणि पैसे भरायचे. या दुकानदारांचा भाविकांवर किती विश्वास आहे बघा... चिठ्ठी लिहून देतात पण स्वतः पैसे घेत नाहीत. गर्दीचा फायदा घेऊन एखादा पैसे नं देता जाऊही शकतो. पण तसं कोणी करणार नाही ही श्रद्धा. शिवाय प्रत्येक दुकानदार प्रत्येक ग्राहकाला हात जोडून "श्री स्वामी समर्थ..." म्हणत होता...
गर्दीतून वाट काढत थोडं पुढे गेल्यावर चप्पल स्टॅंडच्या उजवीकडून मंदिरात प्रवेश करण्यासाठी रांगा लागतात. यात स्त्रियांची रांग वेगळी आणि पुरुषांची वेगळी असते. रांगेतून वाहत वाहत आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो. इथले पुजारी आणि बाकी भक्तगण चांगलेच उद्धट आहेत. लालबागच्या राजाला जाताना जशी ढकला-ढकली होते, तशी ढकला-ढकली होत नाही इथे. पण शब्दांचे बाण जास्त चालवले जातात. या सगळ्या भाऊ गर्दीतून पुढे सरकत आम्ही देव्हाऱ्यापर्यंत पोहोचलो. स्वामींचं दर्शन झालं आणि दिवसभराच्या प्रवासाचा सगळा क्षीण एका झटक्यात निघून गेला. गाभाऱ्यापासून दूर जात आम्ही मंदिराच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर पोहोचलो. आम्ही बाहेर तर आलो, पण वेगळ्याच रस्त्याने. तिथून पुन्हा आत जाण्याच्या रस्त्याने प्रवेश करत, गर्दीतून मार्ग काढत आम्ही चप्पल स्टॅंडपर्यंत पोहोचलो. आमच्या वहाणा घेऊन आम्ही बाहेर पडलो. आता ध्यास होता, वृक्ष पाहण्याचा...
असं म्हणतात, की त्या वटवृक्षातून स्वामी प्रकट झाले. शिवाय त्याच वृक्षाखाली बसून स्वामींनी भाविकांना मोलाची शिकवण दिली आणि एक दिवस स्वामी तिथेच समाधीधीन झाले. अन्नछत्र आणि स्वामी समर्थ मंदिराच्या मध्ये, खालच्या अंगाला जाणारा एक रस्ता आहे. तो रस्ता आपल्याला थेट वटवृक्ष मंदिराकडे घेऊन जातो. त्या वृक्षाला व्यवस्थित जतन करून ठेवलं आहे. वटवृक्ष मंदिराच्या दर्शनानंतर भक्तनिवास पाहण्याची इच्छा झाली. मंदिराच्या जवळ असलेल्या चौकातून थोडं डावीकडे गेल्यावर आपल्याला भक्तनिवास लागतं. राहण्याची उत्तम सोय या भक्त निवासात केली जाते. साधारण माणशी रु. ६००/- ते रु. ७००/-मध्ये ३-४ व्यक्तींच्या राहण्याची आणि जेवणाची चांगली व्यवस्था असते. नुसतीच अंघोळ करायची असेल तरी माणशी रु. १५०/- ते रु. २००/- मध्ये सुमारे तासभरासाठी खोली दिली जाते...
स्वामी समर्थ मंदिर, वटवृक्ष मंदिर, अन्नछत्र आणि भक्तनिवास असा दोन तासांचा पवित्र प्रवास करून मन तृप्त झालं होतं. स्वामींची ती दैवी प्रतिमा मनात ठेऊन आम्ही सोलापूरला आमच्या हॉटेलवर परतलो. भवानीमातेचं दर्शन झालं नाही, ही खंत मनात होती. पण स्वामींचं पूर्ण दर्शन झालं, हा आनंदही होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ जानेवारी रोजी सकाळी ६:०५च्या वंदे भारत गाडीने आम्ही सोलापूर सोडलं आणि मुंबई गाठली, ती स्वामींचा आशीर्वाद आणि पाठिंबा घेऊनच...
श्री स्वामी समर्थ...
@ अनिकेत परशुराम आपटे.
















Comments
Post a Comment